धरणगाव-अविनाश बाविस्कर | दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटाच्या दोन प्रमुख पदाधिकार्यांमधील वादाचे प्रतिबिंब आज वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फलकातून दिसून आले असून याची गावात चर्चा आहे. तर, या संदर्भात आम्ही दोन्ही बाजूंना बोलते केले असता त्यांनी असा प्रकार नसल्याचा दावा केला.
या संदर्भातील माहिती अशी की, शिंदे गटातील दोन प्रमुख पदाधिकार्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी जबरदस्त शाब्दीक चकमक झडली. सामंजस्याचे हा प्रकार मिटविण्यात आला असला तरी पक्षातील अंतर्गत कलह यातून उफाळून आल्याचे अधोरेखीत झाले. दरम्यान, याचेच प्रतिबिंब हे आज विजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फलकांमधून दिसून आले. त्यांच्या फलकांवर गुलाबभाऊंसह अन्य मान्यवरांचे फोटो हे प्रोटोकॉलनुसार घेण्यात आले असले तरी प्रमुख दोन पदाधिकार्यांना मात्र यावर स्थान नसल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे ही बाब पहिल्यांदाच घडल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली.
आम्ही या संदर्भात विजय महाजन यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी फोटोंची संख्या खूप झाल्याने फलकावर फोटो आले नसतील असे सांगत वादाचा प्रश्न नसल्याचे सांगितले. तर दोन्ही पदाधिकार्यांनी मात्र यावर थेट भाष्य करण्याचे टाळत जे काही आहे ते समोर असल्याचे मात्र त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. अर्थात, यातून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली हे देखील तितकेच खरे !