मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर एक भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बिघाड झालेल्या सिग्नल यंत्रणेत दुरुस्ती करताना तिघांनाही लोकलने उडवले. वसई रोड आणि नायगाव रेल्वेस्थानकाच्या दरम्यान सोमवारी रात्री (22 जानेवारी) ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मुख्य सिग्नल निरीक्षक वासू मित्र यांच्यासह सोमनाथ लंबुरे आणि सचिन वानखेडे अशा तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार , सिग्नलिंग हे डिपार्टमेंटमधील हे तीनही कर्मचारी सोमवारी रात्री सिग्नल यंत्रणेत झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेले होते. मात्र वसई रोड ते नायगाव अप मार्गावर जाणाऱ्या एका लोकलने त्यांना उडवलं. लोकलची धडक एवढी भीषण होती की त्या तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. रात्री 8 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघाताची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली. या दुर्दैवी घटनेनंतर मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत म्हणून 55 हजार रुपये रेल्वेकडून देण्यात आले आहेत. तर उर्वरीत रक्कम 15 दिवसात देण्यात येणार आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले सचिन वानखेडे आणि सोमनाथ लंबुरे यांच्या कुटुंबियाना 40 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तर मुख्य सिग्नल निरीक्षक वासु मित्र यांच्या कुटुंबियांना 1 कोटी 24 लाख रुपयांची मदत रेल्वेकडून मिळणार आहे. या अपघाता प्रकरणी पश्चिम रेल्वेनोेही चौकशीचे आदेश दिले आहेत.