जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास, प्रादेशिक पर्यटन, नवीन शाळा खोली बांधकामे यासह विविध विकास कामे करण्याकरता आज एकाच दिवशी तब्बल ३८ कामांचे १९ कोटी ९४ लाख रुपयांचे कार्यारंभ आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचे आदेशान्वये निर्गमित करण्यात आले आहेत.
नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मागील आठवड्यात जिल्हा परिषदेची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी जिल्हा नियोजनाच्या कामांना गती देण्याचे आदेश दिले होते. या सूचनेनुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यारंभ आदेश निर्गमित केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यारंभ आदेश निर्गमित झाल्याने मंजूर विकास कामांना चालना मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १९ कोटी ९४ लाख रुपयांच्या तब्बल ३८ कामांना आज विविध विभागांमार्फत देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यताना बांधकाम विभागामार्फत कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
यात ७ कामांसाठी २ कोटी ९४ लाख ११ हजार ६७८ रुपये, ११ कामांसाठी ८ कोटी ३६ लाख ५३ हजार ७२६ रुपये, तसेच १२ कामांसाठी ५ कोटी ८५ लाख ७७ हजार ४३४ रुपये, ४ कामांसाठी १ कोटी ६७ लाख ४ हजार ६२४ रुपये, २ कामांसाठी ४९ लाख ५९ हजार ४१२ रुपये, तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत १८ लाख ८३ हजार २५५ रुपये, प्रादेशिक पर्यटन अंतर्गत २९ लाख ७५ हजार ९५५ रुपये, तर नवीन शाळा खोली बांधकामासाठी ११ लाख ९७ हजार ९४५ रुपयांच्या अशा १९ कोटी ९४ लाखांच्या कामांचे कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले.
यामध्ये विविध विकास कामांसोबतच जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास, प्रादेशिक पर्यटन, जिल्ह्यात नवीन शाळा खोली बांधकामे होणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या आदेशान्वये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, मुख्या लेखा वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.