तांबापूरातील कुटुंबांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी; अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तांबापूरा परिसरातील झोपडपट्टी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त कुटुंबांना त्वरीत शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनेच्या वतीने शुक्रवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना देण्यात आले.

जळगाव शहरात गुरुवारी ६ जुलै रोजी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे तांबापुर परिसरातील झोपडपट्टी भागात सांडपाण्याचा निचरा न झाल्याने पावसाचे पाणी घरात शिरले, त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून त्यांची राहण्याची देखील गैरसोय झाली आहे. आदर्श नगरातील गटारीचा व सांडपाण्याचा प्रवाह तांबापुर भागात जोडल्या गेल्याने तसेच रस्त्याचे पाणीही या भागात खोलगट व झोपडपट्टीयुक्त असल्याने पाणी शिरले. त्यामुळे झोपडपट्टीधारकांचे नुकसान झाले आहे. जळगाव शहर महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याने यास नैसर्गिक आपत्ती न बोलता मानवनिर्मिती आपत्ती असल्याने शासनाकडून त्वरीत नुकसानग्रस्तांना प्रत्येकी ५० हजारांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

याप्रसंगी जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारूख शेख, इमदाद फाऊंडेशनचे मतीने पटेल, वसीम शेख, इशा शेख, अरशद शेख, अमजद खान आसिफ शाह, राष्ट्रवादी अल्पसंख्यांचे अध्यक्ष मजहर पठाण, सामाजिक कार्यकर्ते पराग कोचुरे, धारा ठक्कर, सरला सैंदाणे, फैजान शेख, हाशिम शेख, रजा मिर्झा आदी उपस्थित होते.

Protected Content