ब्रह्माकुमारीजतर्फे राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कमी होत असलेले उर्जा स्त्रोत, वाढते पर्यावरण प्रदूषण, पारंपरिक उर्जा साधनांचा तुटवडा आदि समस्या वाढत असून पुढील पिढीसाठी आजची बचत हीच उद्याची सुरक्षा` असेल त्यासाठी पारंपरिक ऊर्जा साधना ऐवजी अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर हाच ऊर्जा संवर्धनासाठी प्रमुख उपाय आहे, असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी ब्रह्माकुमारी विद्यालयात केले.

देशातील विविध ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रांतर्फे राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जळगाव येथील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रातर्फे आज गिरणा टाकी जवळील पार्वतीनगर शाखेत ऊर्जा संवर्धन दिवस साजरा करण्यात आला. ऊर्जा संवर्धनाचे महत्व सांगतांना ब्रह्माकुमारीज् माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी वीजेच्या अपव्ययाच्या अगदी छोट्या छोट्या परंतु दुर्लक्षित कृतींकडे सजगपणे पाहण्याचे आवाहन केले. त्यात घरात, कार्यालयात ज्याठिकाणी कुणी बसले नाही तेथील वीज उपकरणे गरज नसेल तेव्हा तातडीने बंद करणे अशा स्वयंअनुशासीत सवयी लावल्यास मोठ्या प्रमाणात उर्जा संवर्धनासाठी आपण हातभार लावू शकतो असे सांगितले. तोटी असणारे नळ वापरुन पाणी अपव्यय टाळणे, जास्त वीज लागणाऱ्‍या जुन्या, कालबाह्य उपकरणांना बदलणे इत्यादी छोट्या बाबी सुद्धा मोठ्या प्रमाणात उर्जा बचत करवितात. याप्रसंगी उपस्थितांनी उर्जा बचतीची प्रतिज्ञा सुद्धा केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजयोगी मधुकर सोनार हे होते. तर सुरेखा धनराळे यांनी प्रतिज्ञा करविली. प्रा. मिलन भामरे यांनी आभार व्यक्त केले.

Protected Content