धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडीया बँकेजवळून एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या कापड पिशवीतून धारदार वस्तूने कापून २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील हिंगोली खुर्द येथे राहणारे सेवानिवृत्त शिक्षक सुरेश रामचंद्र महाजन (वय-७३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पेन्शनचे पैसे घेण्यासाठी ते गुरुवारी २ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता धरणगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत आले होते.
त्यावेळी बँकेतून त्यांनी २५ हजार रुपये काढून एका कापडी पिशवीत घेऊन बँकेबाहेर निघाले. दरम्यान रस्त्याने पायी जात असताना अज्ञात चोरट्याने धारदार वस्तूने त्यांची कापडी पिशवी कापून २५ हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाला. दरम्यान चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक सुरेश महाजन यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा करीत आहे.