जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील खंडेराव नगरात येथे पैसे मागण्याच्या कारणावरून पतीकडून पत्नीला लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शारदाबाई जगन्नाथ कुंभार (वय-३५) रा. खंडेराव नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव या महिला आपले पती जगन्नाथ कुंभार आणि सासू सरस्वती कुंभार यांच्यासह वास्तव्याला आहे. मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता शारदाबाई कुंभार यांनी काही वस्तू घेण्यासाठी पतीकडे पैसे मागितले.
याचा राग आल्याने पती जगन्नाथ कुंभार आणि सासू सरस्वती कुंभार या दोघांनी लाकडी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. दरम्यान विवाहितेने याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती जगन्नाथ कुंभार आणि सरस्वती कुंभार या दोघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश चव्हाण करीत आहे.