बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना-२.० राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या अकोला परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील १८३ उपकेंद्रांच्या सक्षमीकरणाची कामे युध्दपातळीवर पुर्ण करा. असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी दिले.
बुलडाणा येथे पोलिस मुख्यालयातील ‘वसुंधरा’ सभागृहात आयोजित अकोला परिमंडलाच्या आढावा बैठकीत संचालक श्री. ताकसांडे बोलत होते. या बैठकीला नागपूर प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. दत्तात्रय पडळकर यांच्यासह अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

परिमंडलात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यासाठी परिमंडलातील १८३ उपकेंद्रांमध्ये सौर ऊर्जेसंदर्भात पूर्वतयारीची दुरूस्तीची व सक्षमिकरणाची विविध कामे सुरु आहेत. या सर्व कामांचा संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी यावेळी आढावा घेतला.
तसेच यावेळी श्री ताकसांडे यांनी कृषी पंपाच्या प्रलंबित वीज जोडण्याचा जिल्हानिहाय आढावा घेतला आणि प्रलंबित कृषी पंपाच्या वीज जोडणी देण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश देत प्रतिक्षा यादी शुन्य करण्याचे यावेळी त्यांनी सांगीतले .
पायाभूत यंत्रणा उपलब्ध आहे अशा ठिकाणी ग्राहकांनी कोटेशनचा भरणा केल्यानंतर २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही करण्याचे, तसेच मागेल त्याला तत्काळ वीज जोडणी देता यावी . त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.
इज ऑफ लिव्हिंग नुसार ग्राहकांना गतीमान सेवा देण्यावर जोर द्यावा.ग्राहकांच्या वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रारी, अचूक बिलिंगसह इतरही विविध तक्रारींची दखल घेत त्याचे तत्परतेने आणि वेळेत निराकरण करा.त्यासाठी स्थानिक यंत्रणेने अधिक संवेदनशील व सजग राहिले पाहिजे. रब्बी हंगामाला लवकरच सुरवात होत आहे. त्यामुळे कृषी रोहित्र नादुरुस्त होणार नाही यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीचे कामे ताबडतोब करण्यात यावी. तसेच रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण शून्यवत राहील या उद्दिष्टाने उपाययोजना करण्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.
महावितरणचा आर्थिक गाडा चालविण्यासाठी प्रत्येक महिन्याचे सर्वच वर्गवारीतील ग्राहकांकडून शंभर टक्के वीजबिल वसुली होणे गरजेचे आहे.कार्यकारी अभियंता यांनी विभागानुसार योग्य नियोजन करत वीजबिल वसुली प्राधान्याने करावी.वसुलीत हयगय सहन करण्यात येणार नाही अशा स्पष्ट सुचनाही यावेळी त्यांनी दिल्यात.
३३ केव्ही सागवान उपकेंद्राची केली पाहणी;
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मध्ये निवडण्यात आलेल्या बुलडाणा तालुक्यातील ३३ केव्ही सागवान उपकेंद्राला संचालक श्री ताकसांडे यांनी भेट देऊन उपकेंद्राची पाहणी केली. यावेळी सुरू असलेली देखभाल दुरूस्तीची कामे त्वरीत पुर्ण करण्यासह अनेक उपयुक्त सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सागवान उपकेंद्रासाठी सौर प्रकल्प उभारण्यास शासनाने १४ एकर जागा उपलब्ध करून दिली आहे.या प्रकल्पातून २.७४ मेगा वॅट विजेेची निर्मिती होणार असुन त्यामुळे परिसरातील ५ गावातील अकराशे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे.



