जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वेगवेगळ्या जिल्ह्यासह राज्यातून दुचाकी चोरून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश करून चार जणांना अटक केली होती. यातील मुख्य सूत्रधार संतोष उर्फ शेरा गजानन इंगोले रा.पांगरी कुटे ता.मालेगाव जि.वाशिम याला देखील अटक करण्यात पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा, वासिम, अकोला जिल्ह्यासह गुजरात राज्यातून दुचाकी चोरी करून त्याची जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात विल्हेवाट लावणारी टोळीचा पर्दाफाश केला होता. यात सुनील शामराव बिल रा. पिंप्री ता. एरंडोल, खुशाल उर्फ भैय्या राजू पाटील, गोविंदा अभिमन्यू कोळी दोन्ही रा. नागदुली ता.एरंडोल आणि हर्षल विनोद राजपूत रा. मोहाडी ता. पाचोरा या चार संशयित आरोपींना ३० ऑगस्ट रोजी चोरीच्या १६ दुचाकींसह अटक केली होती. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संतोष उर्फ शेरा गजानन इंगोले हा फरार होता. दरम्यान जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते. त्यानुसार बुधवारी ६ सप्टेंबर रोजी मुख्य सूत्रधार संशयित आरोपी संतोष इंगोले हा जळगाव शहरात दुचाकी विक्री करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सावळे, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन, प्रीतम पाटील, पोलीस नाईक भगवान पाटील, हेमंत पाटील, कृष्णा देशमुख, ईश्वर पाटील, सचिन महाजन, लोकेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सूर्यवंशी, प्रमोद ठाकूर यांनी कारवाई करत संशयित आरोपी संतोष उर्फ शेरा गजानन इंगोले याला जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने बुलढाणा, वासिम, अकोला यासह गुजरात राज्यातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या ८ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.