एरंडोल (प्रतिनिधी) येथील माहेश्वरी महिला संघटनच्या वतीने रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयास आंतरराष्ट्रीय मासिक धर्म स्वच्छता व जनजागृती दिनानिमित्त नुकतेच ‘सॅनिटरी पॅड वेडिंग मशिन’ भेट देण्यात आले. माहेश्वरी महिला संघटनच्या तालुकाध्यक्षा मीना मानुधने यांच्याहस्ते मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने यांच्याकडे मशिन सुपूर्द करण्यात आले.
माहेश्वरी महिला संघटनच्या वतीने महिला व किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव व जागृती व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘समाधान एक पाहाल’ या उपक्रमांतर्गत सॅनिटरी पॅड अल्पदरात उपलब्ध व्हावे, या उद्देशाने संघटना प्रयत्न करीत आहे. राज्यातील माहेश्वरी समाजातील महिलांनी पुढाकार घेऊन जागतिक मासिक धर्म दिवसानिमित्त ठिकठीकाणी सुमारे दीड हजार मशिन बसविले असल्याची माहिती तालुकाध्यक्षा यांनी दिली. महिलांनी व विद्यार्थिनीनी या मशीनचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास संघटनेच्या सचिव विद्या काबरा, ममता बिर्ला, भारती बियाणी, राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. उज्वला राठी, सचिव स्वाती काबरा, पुनम बिर्ला, निलीमा मानुधने यांचेसह संघटनेच्या पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. माहेश्वरी महिला संघटनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.