रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याचे पाणी व मनोरंजनासाठी दूरदर्शन संच बसविण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

avinash dhakne

 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना शुध्द व थंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वॉटर कुलर व माहिती आणि मनोरंजनासाठी दूरदर्शन संच बसविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिले.

 

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती दिलीप पाटील, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बबीता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, डॉ. किरण पाटील, डॉ. रावलाणी यांचेसह विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, सामान्य रुग्णालयात येणारे बरेचसे रुग्ण हे बाहेर गावाहून आलेले सर्वसामान्य व गरीब कुटूंबातील असतात. त्यांचेवर वेळेत योग्य उपचार करावेत. तसेच त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची शहरात कुठलीही राहण्याची व जेवणाची सोय होत नाही. त्यातच रुग्णाची परिस्थिती बिकट असेल तर ते घाबरलेल्या अवस्थेत असतात. त्यांना किमान प्राथमिक सुविधा म्हणून शुध्द व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉटर कुलर बसवावेत. तसेच मुक्कामास राहणाऱ्या नातेवाईकांना माहिती व मनोरंजन होण्यासाठी प्रतिक्षालय हॉलमध्ये दूरदर्शन संच बसवावा. यासाठी रुग्ण कल्याण समितीस जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठीचा आवश्यक तो प्रस्ताव सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना केली.

Add Comment

Protected Content