जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात दुचाकीच्या वादातून चौघांनी चॉप भोसकून खून केल्याची घटना रविवारी २६ मार्च रोजी रात्री १० वाजता घडली होती. अवघ्या काही तासातच खून करणाऱ्या चौघांना शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अटक करण्यात यश आले आहे. चौघांवर पहाटे चार वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान गोविंदा हटकर (वय-२५) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोपान हटकर हा आई सरलाबाई यांच्यासोबत हरीविठ्ठल नगरात वास्तव्याला होता. आई धुणीभांडीचे काम करतात तर सोपान हा मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. सोपानने दुचाकी हप्त्याने घेतली होती. दुचाकीचे हप्ते थकल्याने शोरूमचे पथक वसुली करण्यासाठी दुचाकी घेवून जातील या भीतीने दुचाकी ही त्याचा मामा सुपडू अर्जून पाटील यांच्या शेतात ठेवलेली होती. २२ मार्च रोजी २०२३ रोजी सोपानचे मित्र गोविंदा शांतीलाल झांबरे रा. नाथवाडा, जळगाव आणि ज्ञानेश्वर दयाराम लोंढे उर्फ नानु रा. कंजरवाडा, जळगाव यांनी परस्पर सोपानला न सांगता दुचाकी शेतातून घेवून जावून त्याचा वापर करत होते. ही बाब सोपानला माहिती समजली. त्याने फोन करून दुचाकी मला परत कर असे सांगितले. त्यानुसार रविवारी २६ मार्च रोजी रात्री ८ वाजता सोपानला दुचाकी घेण्यासाठी गोलाणी मार्केट येथे घेण्यासाठी बोलावले. त्याठिकाणी राहूल भरत भट रा. खोटे नगर आणि करण सुभाष सकट रा. बी.जे.मार्केट कोंडवार जळगाव हे देखील होते. चौघांमध्ये दुचाकी घेवून जाण्यावरून वाद झाला. रागाच्या भरात चौघांनी चॉपर भोसकून सोपानचा खून केला व पसार झाले.
खून झाल्याची घटना घडल्यानंतर रात्री १० वाजता सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात मयताचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. गोपनिय माहितीच्या आधारे पोलीसांनी गोविंदा शांतीलाल झांबरे रा. नाथवाडा, ज्ञानेश्वर दयाराम लोंढे उर्फ नानु रा. कंजरवाडा, राहूल भरत भट रा. खोटे नगर आणि करण सुभाष सकट रा. बी.जे.मार्केट कोंडवार जळगाव या चौघांना अटक केली. चौघांनी खूनाची कबुली दिली. संशयित आरोपींनी चॉपर हा मेशो ॲपवरून ऑनलाईन मागविला होता. असे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी मयत सोपानची आई सरलाबाई हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे सपोनि रविंद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, मनोज भांडारकर, तेजस मराठे, भास्कर ठाकरे, अमोल ठाकूर, योगेश इंधाटे तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, पोकॉ.विजय पाटील यांनी कारवाई केली.