पाळीवसह भटक्या प्राण्यांनी चावा घेतल्याने एप्रिल महिन्यात ४४९ जणांनी घेतले इंजेक्शन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इंजेक्शन विभागामध्ये एप्रिल महिन्यात एकूण ४४९ व्यक्तींनी पाळीवसह भटक्या प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे दाखल होऊन इंजेक्शन व उपचार घेतले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओपीडी काळात सकाळी इंजेक्शन विभाग (१०५) येथे विविध प्राण्याच्या चाव्यावर प्रतिबंधात्मक इंजेक्शन घ्यायला नागरिक येत असतात. तसेच जिल्हाभरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकुळ वाढला आहे. या विभागामध्ये एप्रिल महिन्यात एकूण ४४१ व्यक्तींना कुत्रा चावल्यामुळे उपचार करण्यात आले आहे. यात २४५ पुरुष, ९७ महिला तर ९९ लहान बालकांचा समावेश आहे. उपचार घेणार्‍यांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. तसेच महिन्याभरात ५ रुग्णांना मांजर, १ जणांना डुकर तर २ जणांना माणसाने चावा घेतल्यामुळे उपचार करण्यात आले.

अशी घ्या काळजी
नागरिकांनी त्यांच्यासह लहान मुलांना भटक्या व पाळीव प्राण्यांपासून सावध ठेवावे. प्राणी चावल्यास तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी यावे. कुत्रा चावल्यावर जखम झाकू नका, जखम उघडीच ठेवा. स्वच्छ व भरपूर पाण्याने जखम वाहत्या पाण्याखाली धुवून घ्या, त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी यावे. सकाळी ओपीडी विभागात १०५ मध्ये तर दुपारी आपत्कालीन विभागाला कक्ष क्र. १ मध्ये भेट द्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड यांनी केले आहे.

Protected Content