पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिंगाईत येथील तरूणाची आज भर दिवसा दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसर हादरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहूर ते जामनेर मार्गावर हॉटेल वृंदावन नजीक सोनाळा पहूर शिव रस्त्यावर सोनाळा येथील प्रफुल्ल भरत पाटील यांच्या कपाशीच्या शेतात लिंबाच्या झाडा खाली शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू वाघ ( वय ३७ ) याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. परिसरात याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली.
मद्यपान करून साधला डाव
मयत प्रमोद वाघ सकाळपासूनच घरून निघाला होते .दुपारी जामनेरहून पहूर येथे पत्ता जातो, असे शालक ( रा . पाटखेडा ) यांस फोनवरून त्यांनी सांगितले होते. दरम्यान, यानंतर शेतकरी प्रफुल्ल पाटील हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेताकडे गेले असता त्यांना लिंबाच्या झाडाखाली दारूच्या बाटल्यांसह तीन ग्लास , पाणी बॉटल आणि अर्धवट खाल्लेला वडापाव आढळून आला. बाजूलाच रक्ताने माखलेला दगड पाहताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. मारेकर्यांनी निर्दयपणे प्रमोदच्या डोक्यात दगड टाकल्याने झाडाखाली दगड आणि माती रक्ताने माखली होती . प्रमोदचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर मारेकर्यांनी त्याचा मृतदेह लिंबाच्या झाडापासून शेतात पंधरा ते वीस फूट अंतरावर फरपटत नेऊन टाकून दिल्याचे आढळून आले.
प्रफुल्ल पाटील यांनी तत्काळ पहूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे , जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे , पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड , किरण गर्जे , तालुका समादेशक भगवान पाटील , रवींद्र देशमुख , विनय सानप , ज्ञानेश्वर ढाकरे , गोपाल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
टेलरने पटवली ओळख
मयताच्या चेहर्यावर दगडाने वार केले असल्याने त्याची ओळख पटविण्यासाठी अडचणी आल्या. मात्र त्यांच्या पँटवर चॉईस टेलर्स अशी पट्टी आढळून आल्याने जामनेर येथील चॉईस टेलर्सचे संचालक विजय जैन यांना घटनास्थळी बोलावले असता त्यांनी मयतास ओळखले. यामुळे हा मृतदेह शिंगायत येईल प्रमोद उर्फ बाळू वाघ यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची भेट
चाळीसगाव येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरविली . जळगाव येथील न्यायवैद्यक पथकाचे वाघ यांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले दगड व माती ताब्यात घेतली असून मयताजवळील मोबाईल फोन मारेकर्यांनी लांबविल्याचे समजते.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते . मयत प्रमोद वाघ याच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे पहूरसह सोनाळा परिसरात खळबळ उडाली आहे.