यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वीज बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचार्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्या प्रकरणी पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे.
यावल तालुक्यातील सातोद येथे महावितरणच्या बिलाची थकबाकी मागणीसाठी वीज कर्मचारी गेले असता त्याचा राग येऊन पिता-पुत्राने विज कर्मचार्यासह सोबतच्या कर्मचार्यास शिवीगाळ करत मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून येथील पोलीस ठाण्यात दोघ पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की , तालुक्यातील सातोद येथील राहणारे सुनील भास्कर धांडे यांच्याकडे मंगळवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीचे थकबाकी असलेले विजबिल मागणीसाठी येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ योगेश प्रल्हाद बारी राहणार यावल व सोबतचे कर्मचारी गिरीश सतीश चौधरी हे गेले होते. या कर्मचार्यांनी धांडे यांना वीज बिल भरण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन सुनील धांडे व त्यांचे पुत्र योगेश सुनील धांडे या दोघांनी दोन्ही कर्मचार्यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
या संदर्भात योगेश बारी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलीस ठाण्यात पिता-पुत्रा विरुद्ध भादवी कलम ३५३, ३३२, ३२३,५०४,५०६,व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या पिता-पुत्राला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.