मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार काळाच्या पडद्याआड

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मराठा समाजाच्या उत्थान आणि उन्नतीसाठी अविरत प्रयत्न करणारे महनीय व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणारे शशिकांत पवार हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. शशिकांत पवार (वय ८२) यांचे आज कोकणातून परत येताना संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रत्नागिरी मराठा बिझनेसमेन फोरमच्या बैठकीसाठी ते परवा गेले होते. कालसंध्याकाळी तेथून परत येताना त्यांना पाली परिसरात हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेच खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आले. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्यामागे पत्नी तसेच वीरेंद्र व योगेश पवार हे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मराठा महासंघाच्या माध्यमातून शशिकांत पवार यांनी केलेले कार्य अजोड असे मानले जाते. अण्णासाहेब पाटील यांच्या पश्‍चात त्यांनी संघटनेचे यशस्वीपणे नेतृत्व केले. विविध सामाजिक आंदोलनांमध्ये ते सक्रीयपणे सहभागी होते. यासोबत मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर या संस्थेमार्फतही त्यांनी भरीव कार्य केले. तर अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संस्थेचे ते राज्य अध्यक्ष होते. त्यांनी गावदेवीला शारदा शिक्षण सेवा समितीची स्थापना करून त्यामार्फतही शैक्षणिक कार्य केले होते.

शशिकांत पवार यांच्या रूपाने मराठा समाजातील एक मोठे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत असून त्यांना विविध मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली आहे.

Protected Content