मुक्ताईनगर – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रद्धा महिला मंडळातर्फे नेहमीच महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून एक अनोखी स्पर्धा ठेवण्यात आली होती. ती म्हणजे “माझी चुलीवरची भाकरी स्पर्धा” ही स्पर्धा गावाबाहेर महादेव मंदिर परिसर मुक्ताईनगर येथे नैसर्गिक वातावरणात घेण्यात आली.
या वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन श्रद्धा योग मंडळाच्या संचालिका प्रा .डॉ. प्रतिभा ढाके यांनी महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते .मोठ्या उत्साहाने महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ऐनवेळी भाकरी ही परातीत न थापता हातावरती थापून भाकरी करायची असा नियम केल्याने महिलांचा एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मात्र या लुप्त झालेल्या पद्धतीने भाकरी करण्याचा आनंद महिलांनी घेतला. यात अनेक गंमती जंमती ही झाल्यात .त्यात भाकरी थापणे, भाजणे, भाकरीचा आकार ,तयार फुगलेली भाकरी या सर्व गोष्टींचा विचार करून कुसुमताई बेलदार यांनी भाकरीचे परीक्षण करून स्पर्धेचा निकाल घोषित केला.
या स्पर्धेत ललिता सोनार, लावण्या अहिरे, लता माळी, मालती अहिरे, अनुराधा पाटील, वैशाली सुरळकर, सुनिता वाडेकर, अंजली बोदडे, अनुराधा खेवलकर, पार्वताबाई तायडे यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत अर्चना खेवलकर यांनी प्रथम, तर वैशाली सुरळकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. याप्रसंगी परीक्षा कुसुमताई बेलदार यांनी हातावरची भाकरी कशी करायची ते कौशल्य सोबतच भाकरी भाजण्याची पद्धत व तंत्र हे उपस्थित महिलांना प्रात्यक्षिकासह करून दाखवले.
त्यानंतर सर्व उपस्थित त्यांनी वनभोजनाचा मनमुराद आनंद घेतला. या अनोख्या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनुराधा खेवलकर रवींद्र खेवलकर निखिल यमनरे आरती कोळी हेमराज सपकाळे व श्रध्दा मंडळाच्या सदस्यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या अनोख्या स्पर्धेचे अनेकांकडून कौतुक होत आहे.