पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | खडकदेवळा गावातील विकास सोसायटीचे चेअरमन तथा सेवानिवृत्त पाटबंधारे अधिकारी बारकु पाटील यांचे सुपुत्र प्रशांत पाटील हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बी. एस. एफ.) मध्ये २० वर्ष २ महिने २१ दिवसाची देश सेवा करुन सेवानिवृत्त होत आपल्या मायदेशी परतले.
खडकदेवळा ता. पाचोरा येथील प्रशांत बारकू पाटील यांना लहानपणापासून देशसेवेची आवड होती. वडील नौकरीला असून दोन मोठे भाऊ हे इंजिनिअर होते. व स्वतःचे उच्च शिक्षण चालू होते शिक्षणातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळ काढून प्रशांत पाटील हे सैन्य भरतीसाठी तयारी करत असत.
सैन्यात जावे आणि देश सेवा करावी अशी त्यांची मनापासून इच्छा होती शेवटी दि. ११ जुन २००२ मध्ये त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. व ते नागपूर येथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बी. एस. एफ.) मध्ये कॉन्स्टेबल या पदावर भरती झाले व त्यांचे सैन्य दलातील वाटचाल चालू झाली. त्यांनी सैन्य दलासाठी बेसिक ट्रेनिंग ही जोधपूर (राजस्थान) येथे केले. त्यानंतर त्यांनी राजस्थान, साऊथ बंगाल, नॉर्थ बंगाल, ओरिसा व मेघालय ठिकाणी आपली सेवा दिली. सेवा देत असतांना त्यांना ऑल ओव्हर बेस्ट पुरस्कार व नक्सलाईट विभागात चांगले कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांना वेळोवेळी उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसापत्र, कॅश रिवार्ड, व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
प्रशांत पाटील यांची भारत मातेची सेवा २० वर्ष २ महिने २१ दिवस केली. व ते सेवा पूर्ण करून दि. ३१ आॅगस्ट २०२२ रोजी मेघालय येथून सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रशांत पाटील यांच्या मातोश्री यांनी पाचोरा येथे त्यांचे पूजन करून औंक्षण केले. त्यानंतर प्रशांत पाटील यांनी पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले. त्यानंतर “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” व देशभक्तीपर गाण्यांसोबत त्यांची रॅली ही पाचोर्याहून खडकदेवळाकडे रवाना झाली. गावात गेल्यावर गावातील महिलांनी सुद्धा प्रशांत पाटील यांचे औंक्षण केले. नंतर प्रशांत पाटील यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम विकास सोसायटीच्या प्रांगणात सर्व पंचक्रोशीतील नागरिकांच्या समवेत मोठ्या उत्साहात घेण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार किशोर पाटील, पी. टी. सी. चेअरमन संजय वाघ, भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, धर्मराज सूर्यवंशी, डॉ. यशवंत पाटील, जय हिंद सैनिक संस्था महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी व सदस्य, तसेच संजय निकम, खडकदेवळा गावाचे सरपंच प्रविण निकम, विकास सोसायटीचे चेअरमन बी. एम. पाटील, विकास सोसायटीचे सेवानिवृत्त सेक्रेटरी आधार पाटील, पोलिस पाटील एकनाथ कोळी, ग्रामपंचायत सदस्य व विकास सोसायटीचे सदस्य गावातील आजी – माजी सैनिक व पोलिस मित्र व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.