पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीत गोवंश तस्करीच्या प्रकरणात नियमानुसार कारवाई व्हावी यासाठी फिर्यादी हेमंत गुरव यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले आहे.
याबाबत वृत्त असे की, दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी तालुक्यातील लोहारा येथे गावाच्या बाहेर पाचोरा जामनेर रोडलगत एक संशयास्पद एम. एच. ०४ – जी. सी. ५४६८ क्रमांकाची गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती. त्या गाडी च्या मागील भागास पूर्ण पाट्या लावले असल्याने लोहारा येथील बजरंग दल कार्यकर्ते हेमंत गणेश गुरव यांना दिसल्याने त्यांनी गाडीच्या चालकास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिलीत. यामुळे हेमंत गुरव यांनी गाडीची पाहणी केली असता गाडीत सात गुरे दाटीवाटीने कोंबून निर्दयपणे बांधलेली आढळून आली.

याप्रसंगी हेमंत गुरव यांनी गुरे घेऊन जात असल्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे पावत्या मागितल्या असता चालकाने दि. १६ तारखेच्या बाजाराच्या पावत्या दाखवून लागलीच हिसकावून घेतल्या. परिणामी गुरव यांना शंका आल्यावर गाडीची गेट पासिंगची पावती देखील दाखविल्याने त्या गेट पासिंगमध्ये ५ गुरांची नोंद होती व गाडीत गुरे हे ७ असल्याने सर्व प्रकार हा बनवाबनवीचा लक्षात आल्यावर हेमंत गुरव यांनी तात्काळ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांना फोनवरून संपर्क केला व तात्काळ पोलिसांची मदत मागितली.
दरम्यान, गावातील कार्यकर्ते संतोष कोळी, महेंद्र घोंगडे, समाधान कोळी, अमोल गोंधळे, सागर कोळी, वाल्मिक कोळी यांना देखील बातमी कळताच हे देखील पोलिसांसोबत घटनास्थळी दाखल झाले. गाडी सर्वांच्या मदतीने पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आल्यानंतर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी या संशयितांवर गुन्हे दाखल केले. मात्र त्यांनी यातून संबंधीत आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हेमंत गुरव यांनी केला असून याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे.
या संदर्भातील निवेदनात हेमंत गुरव यांनी म्हटले आहे की, स. पो.नि. महेंद्र वाघमारे यांनी आरोपींना पाठीशी घालण्यासाठी किरकोळ कलमा लावून व पोलिसांनाच फिर्यादी बनवून मनमानी पध्दतीने नियमबाह्य गौ वंश संदर्भात कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील साक्षीदारांची माहिती देखील त्यांनी दिली नाही. त्यावेळी गुरव यांनी विनंती केली की, आम्ही फिर्यादी आणि साक्षीदार राहतो. तरीही वाघमारे यांनी गु. र. नं. ०२१८ / २०२२ दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हा दाखल केला. कुठल्याही प्रकारची फिर्याद वाचू दिली नाही, फिर्यादीत कशाप्रकारे मजकूर लिहला हे देखील वाचू दिले नाही. नंतर दाखल केलेल्या गुन्ह्यांची एफ. आय. आर. ची प्रत मागितली तेव्हा देखील एफ. आय. आर. प्रत दिल्या गेली नाही फक्त नंबर दिला. त्या नंतर आरोपी पार्टीकडून बोगस व बनावट पावत्या सादर केल्याचे गुरव यांना दिसले त्या वेळेस ही हेमंत गुरव यांनी आक्षेप घेतला असता सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी कुठल्याही प्रकारचे काही एक न ऐकता त्यांना विचारले की, सदरचे गुरे हे कुठल्या गौ शाळेत दाखल करत आहात जर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्यानंतर वाघमारे यांनी सांगितले की, मी गुरे हे आरोपींच्या ताब्यात देतोय. त्यामुळे मी गुरे व गाडी जप्त करणार नाही. त्यानुसार वाघमारे यांनी गुरे हे संबंधित लोकांना देऊन जिथे कत्तलीसाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने तसेच निर्दयतेने दोरीच्या सहाय्याने कोंबून दाटीवाटीने बांधून घेऊन जात असतांना जे कलमा लागतात त्या कलमा त्यांनी न, लावता किरकोळ कलमा लावून गुरे सोडून देऊन मुद्देमाल नष्ट केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
यात पुढे म्हटले आहे की, आपण सर्व प्रकारविषयीची लेखी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे व जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांना देऊन पोलीस अधीक्षक यांनी जिल्हा विहिंप मंत्री देवेंद्र भावसार, विहिंप जिल्हा सहमंत्री ऍड. श्रीराम बारी, सामाजिक कार्यकर्ते ऍड. निलेश जाधव व तक्रारदार हेमंत गुरव यांनी प्रत्यक्षपणे भेट घेतली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांना सदर प्रकरणाबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे अधिकारी यांची सर्व प्रकरणाची चौकशी १० दिवसात लेखी अहवाल सादर करण्यासाठीचे आदेश दिले असून ह्या विषयी चौकशी करण्यासाठीचे आदेश दिलेले आहे.
याबाबत हेमंत गुरव म्हणाले की, आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने गौ वंश रक्षण करतो. त्यात आमचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतांना आम्ही ज्या ठिकाणी बेकायदेशीर गौ तस्करी व गौ हत्या होईल अशी शंका आल्यास आम्ही तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत असतो. परंतु जळगाव जिल्ह्यात खास करून पाचोरा तालुक्यात पोलीस प्रशासनाकडून प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, तसेच सन – १९७७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ९, महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ दि. १४ जून २०१७ पर्यंत सुधारित तसेच परिवहन नियमाचे आधारे नियमोचित कुठल्याही प्रकारची कारवाई होतांना दिसून येत नाही. तसेच दि. १६ तारखेला जी काही पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यात आली आहे ती माझ्या मते पूर्ण चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली कारवाई असून आरोपी यांना संरक्षण देण्यासाठी व त्यांना पाठीशी घालून मुद्देमाल नष्ट करण्यासाठी संबंधित अधिकारी यांनी प्रयत्न केला आहे.
या संदर्भात आपण लवकरच छत्रपती संभाजी नगर खंडपीठात याचिका दाखल करणार आहोत अशी माहिती देखील हेमंत गुरव यांनी दिली आहे. तरीही तालुक्यातील सर्व कार्यकर्ता यांना विनंती आहे की, पोलिसांना घटनाक्रम कथन केल्यानंतर पोलिस जरी फिर्यादी असले तरी त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे किंवा नाही ह्या विषयी खात्री करून घेऊन पोलिसांना खरी माहिती देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती करा त्यानंतर पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न, दिल्यास तात्काळ त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचेशी संपर्क साधून योग्य नियमांचे पालन करून कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहन देखील हेमंत गुरव यांनी केले आहे.


