पुन्हा एक आमदार एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर ?

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यात आला असतांना शिवसेनेतील एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.

दिनांक २२ ऑगस्ट रोजी राज्यातील सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. यात शिवसेनेची मालकी नेमकी कुणाची याबाबत स्पष्ट निकाल येण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटांचे लक्ष सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लागलेले आहे. दरम्यान, यातच पावसाळी अधिवेशनात या दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर तुटून पडल्याचेही दिसून आले आहे. या सर्व गदारोळात शिवसेनेचा अजून एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतली असून ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होऊ शकतात असे वृत्त ‘महाराष्ट्र टाईम्स’ या वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आमदार राजन साळवी हे अनुकूल आहेत तर खासदार विनायक राऊत हे कायम प्रकल्पविरोधी मत मांडत आले आहेत. या अंतर्गत कलहामुळे राजन साळवी शिंदे गटात सामील होणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content