फडणविसांना लोकसभेची उमेदवारी द्या : ब्राह्मण महासंघाची मागणी

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देवेंद्र फडणवीस भाजपमधील आघाडीच्या सक्षम नेतृत्वांपैकी एक असल्याने त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षातर्फे केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय प्रचार समितीत निवड करण्यात आली आहे. यातून त्यांची राजकीय उंची वाढल्याचे मानले जात आहे. विशेष करून गडकरी यांची राष्ट्रीय समितीतून गच्छंती झाल्यानंतर फडणवीस यांना केंद्रीय समितीत घेण्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. फडणवीस यांच्या नियुक्तीचे ब्राह्मण महासंघाने स्वागत केले असून भाजप नेतृत्वाकडून एक अपेक्षादेखील व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात महासंघाचे अध्यक्ष  गोविंद कुलकर्णी यांनी पत्र लिहले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, की देवेंद्र फडणवीस अत्यंत कुशल राजकीय व्यक्तीमत्व आहे. मागील पाच वर्षांत त्यांनी ते सिद्ध केले. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य केले. देवेंद्र फडणवीस भाजपाचे भविष्य आहे. भाजपाला सक्षम नेतृत्व देणार्‍या नरेंद्र मोदी यांच्यानंतर जी काही दोन-तीन नावे आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक महिन्यापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे एक पाऊल जरी मागे यावे लागले असले तरी हा प्रारंभ आहे. हा निर्णय भाजपाचा योग्य निर्णय मानला जाऊ शकतो.

देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देऊन राष्ट्रीय राजकारणात मानाचे पद द्यावे अशी मागणी देखील या पत्रातून करण्यात आलेली आहे. अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्यानंतर नेतृत्वाची ही परंपरा देवेंद्र फडणवीस कायम राखतील असा विश्वास वाटतो, असे पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

Protected Content