जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील एल-सेक्टर परिसरात तरूणाला अज्ञात दोन जणांनी दुचाकीवर येवून हातातील कोयत्याने वार करून दुखापत करून मोबाईल आणि रोकड जबरी हिसकावून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाऊसाहेब गोपीचंद पाटील (वय-३८) रा. आदर्श नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करत असतो. मंगळवार ९ ऑगस्ट रोजी भाऊसाहेब पाटील हा तरूण सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील एल-सेक्टरमधील नाईक इंडस्ट्रिज येथे मोबाईलवरून बोलत पायी जात असतांना अचानक दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवर आले. यातील एकाने हातातील कोयता तरूणाच्या डोक्यावर व हातावर वार करून जखमी करून हातातील मोबाईल आणि रोकड असा एकुण ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जबरी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात बुधवार १० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.