अपघातातील ‘त्या’ जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । कामावर जाण्यासाठी मित्राच्या दुचाकीने जात असतांना वाळूच्या डंपरने जोरदार दिलेल्या धडकेत जखमी झालेले अक्षय विजय पाटील (वय-३५) रा. चंदूअण्णा नगर या तरूणाचा आज १८ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयात मन हेलवणारा आक्रोश केला होता. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिंधी कॉलनी परिसरातील डॉ. आंबेडकर वस्तीगृहाजवळील रहिवासी सिद्धार्थ त्र्यंबक मोरे व चंदुअण्णानगरातील रहिवासी अक्षय विजय पाटील हे दोघ रेमंड कंपनीत नोकरीस होते. ९ मार्च रोजी अक्षय पाटील हा त्याच्या (एमएच १९ सीएल ६७७७) क्रमांकाच्या मोटारसायकलने कंपनीत जात होता. दरम्यान सिंधी कॉलनीजवळ सिद्धार्थ मोरे यांनी त्याला हात दाखवित कंपनीत जाण्यासाठी लिफ्ट मागितली. अक्षयने त्यांना लिफ्ट देत ईच्छादेवी चौफुलीच्या दिशेने जात असतांना मागून भरधाव येणार्‍या (एमपी ०४ जीएए ३४९२) क्रमांकाच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या धडकेत या अपघातात सिद्धार्थ मोरे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अक्षयच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अक्षयच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्याव शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने तो गेल्या दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता अखेर आज उपचार सुरु असतांना त्याची झुंज अपयशी ठरली आणि त्याची आज सकाळी प्राणज्योत मालवली.

अक्षयचे लहानपणीच पितृछत्र हरपल्याने तो घरात एकटा कमावता होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी डंपरचालक धीरज मोहन धनगर (वय १८, रा. कडगाव, ता. जळगाव) याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content