भटक्या जमातींना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देणार : नरेंद्र पवार (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी | राज्यातील भटक्या आणि विमुक्त जमातीतील घटक हे अतिशय बिकट स्थितीत राहत असून त्यांच्याकडे साधे रेशनकार्ड सुध्दा नाही. याचमुळे आम्ही त्यांना रेशनकार्डसह शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.

भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार आज जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. याप्रसंगी पक्षाची बैठक आटोपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ५२ जाती या भटक्या जमातीत येत असून आम्ही या सर्वांच्या समस्या जाणून घेत आहोत. याच्या अंतर्गत आता उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू असून यात आज जळगावाला आलो आहोत. यात भटक्या जमातीच्या नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांना प्रगतीच्या संधीपासून ते वंचित असल्याचे दिसून आले. यात अगदी साधे रेशन कार्ड देखील अनेकांकडे नाहीत. तर बर्‍याच ठिकाणी रेशन आणि आधार लिंक नसल्याने त्यांना अडचणी येतात. यामुळे त्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याचे आम्हाला जाणवले आहे.

नरेंद्र पवार म्हणाले की, अत्यंत बिकट अवस्थेत भटक्या जमाती राहत आहेत. यामुळे त्यांच्या मदतीसाठी आम्ही कार्य करत आहोत. सीएए आणि एनआरसी यांच्यात रेशनकार्ड हे आवश्यक असल्याने आम्ही भटक्यांना रेशनकार्ड मिळवून देणे हे आमच्या प्राधान्यक्रमावर आहे. या माध्यमातून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न भाजप भटके विमुक्त आघाडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने आज जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली असून यात काही पदाधिकार्‍यांची नियुक्ती देखील करण्यात आल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी याप्रसंगी दिली. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष महानगर दिपक सूर्यवंशी,  मनपा स्थायी  समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शालीक पवार, शहरअध्यक्ष भूषण लाडवंजारी, सरचिटणीस अनिल जोशी, प्रदेश महिला संयोजिका डॉ. उज्वला हाके, प्रदेश युवती संयोजिका भाग्यश्री ढाकणे, उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथ ढगे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, प्रदेश कार्यालय मंत्री राज खैरनार आदी उपस्थित होते.  

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/543110403503123

 

Protected Content