यशोमती ठाकूर यांच्याकडून सहा जणांचा मृत्यू झालेल्या परदेशी कुटुंबाचे सांत्वन

 

 

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी | कोरोनामुळे एका महिन्यातच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झालेल्या येथील परदेशी कुटुंबातील मुलांची भेट आज महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी घेऊन त्यांचे सांत्वन केले.

 

कोरोनामुळे अनेक कुटुंबेची कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत. याच प्रकारे सावदा येथील परदेशी कुटुंबाने सहा जणांना एका महिन्यातच गमावले आहे. सावदा येथील परदेशी कुटुंब हे कर्तबगार आणि प्रतिष्ठीत मानले जाते. या कुटुंबातील पत्रकार म्हणून कार्यरत असणारे कैलाससिंह गणपसिंह परदेशी (वय ५५) यांचे मार्च महिन्यात २५ तारखेला कोरोनाचा उपचार सुरू असताना निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे बंधू किशोरसिंह गणपतसिंह परदेशी (वय ५२) आणि त्यांची पत्नी संगीता किशोरसिंह परदेशी (वय ४८) यांचे देखील कोरोनाचा उपचार सुरू असताना अनुक्रमे २१ व २५ मार्च रोजी निधन झाले. परदेशी कुटुंबीय या धक्क्यातून सावरत नाही, तोच कैलाससिंह आणि किशोरसिंह परदेशी यांच्या मातोश्री कुवरबाई गणपतसिंह परदेशी यांचे अन्य व्याधीवर उपचार सुरू असताना निधन झाले होते. यानंतर २७ एप्रिल रोजी याच कुटुंबातील प्रतिभा कैलाससिंह परदेशी यांचाही जळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.

 

एका महिन्यातच घरातील सहा कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने परदेशी दाम्पत्यावर तीव्र आघात झाला आहे. या अनुषंगाने आज महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर या जिल्हा दौर्‍यावर आल्या असता, त्यांनी आज परदेशी कुटुंबाची भेट घेऊन यातील तरूणाईला धीर देत त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

याप्रसंगी ना. यशोमती ठाकूर यांनी परदेशी कुटुंबातील सदस्यांशी वार्तालाप करून त्यांच्याकडून लागोपाठ झालेल्या दुर्दैवी आघातांची माहिती जाणून घेतली. राज्य सरकारने आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी जाहीर केलेल्या सर्व योजनांचे लाभ हे त्यांना मिळतील अशी ग्वाही त्यांनी दिली. तर आपण तुमच्यासोबत असल्याचा धीर देखील ना. ठाकूर यांनी याप्रसंगी दिला. तर त्यांनी परदेशी कुटुंबातील पाच मुलांना प्रत्येकी दहा हजार रूपयांची वैयक्तीक मदत देखील केली.

 

Protected Content