शेतकऱ्यांचा कापूस घेवून फसवणूक करणारा व्यापारी जेरबंद

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वाडी येथील सुमारे ५१ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करुन पसार झालेल्या गावातीलच व्यापारी अखेर एक वर्षानंतर पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीसांच्या हाती लागला असून पोलिसांच्या या कारवाईमुळे वाडी शेवाळे परीसरातील शेतकऱ्यांमधे आपल्याला आता न्याय मिळणार असल्याने समाधानाचे वातावरण पहावयास मिळत आहे. पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसांनी संशयीत आरोपीस नवसारी (गुजरात) येथून ताब्यात घेतल्यानंतर पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्यास ३० जानेवारी २०२३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पाचोरा तालुक्यातील वाडी येथील राजेंद्र पाटील हा व्यापारी गेल्या अनेक वर्षापासून गावातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करुन शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देत होता. राजेंद्र पाटील याचा व्यवहार चांगला असल्याची त्याची पत पाहून शेतकऱ्यांनी सन – २०२२ मध्ये २० ते २५ शेतकऱ्यांनी त्यास ८४ लाखांचा कापूस उधार दिला होता. मात्र शेतकऱ्यांच्या विस्वासाला तडा देत राजेंद्र पाटील हा संपूर्ण पैसा घेऊन पसार झाला. शेतकऱ्यांनी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी फसवणूक झाल्याचा पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी राजेंद्र पाटील याच्या शोधासाठी पथक तयार करून अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. आरोपीचा शोध घेऊन पैसे परत मिळावे यासाठी “जगा आणि जगू द्या” विकास मंचचे अध्यक्ष निळकंठ पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव पाटील, सचिव भूषण वानखेडे यांचे सह गावातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी येथील साईबाबा मंदीरात तब्बल ५१ दिवस उपोषण केले होते. मात्र त्यांची राजकीय पदाधिकारी, पोलिस अधिक्षकांपासून ते अनेकांनी आरोपी शोधून भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देत उपोषण सोडले होते.

तब्बल एक वर्षानंतर आरोपी जेरबंद
संशयीत आरोपी राजेंद्र पाटील यांचेवर ४२० कलमाखाली ११ फेब्रुवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस त्यांच्या शोधात होते. मात्र आरोपी सापडत नव्हता. अखेर पोलिसांना राजेंद्र पाटील हा नवसारी (गुजरात) येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, कॉन्स्टेबल मुकेश लोकरे, उज्वल जाधव, जितेंद्र पाटील, रणजित पाटील, शिवनारायण देशमुख, अरुण पाटील, अभिजित निकम, प्रविण देशमुख यांचे पथक तयार करून गुजरात येथील नवसारी येथे पाठविल्यानंतर राजेंद्र पाटील यास ताब्यात घेतले.

Protected Content