चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ‘ट्रॅक्टरचे कर्ज भरण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये’ म्हणत विवाहितेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील करगाव तांडा दोन येथे उघडकीला आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात पतीसह सासरच्यांंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, “तालुक्यातील करगाव तांडा क्र. २ येथील सासर असलेल्या जयश्री दिनेश राठोड (वय-२३) या विवाहितेला लग्नानंतर सुरुवातीचे चार महिने चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर पैशासाठी शाररिक व मानसिक छळ सुरु झाला. त्यात मंगळवार, दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास जयश्री हिला ‘ट्रॅक्टरचा कर्ज भरण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये’ असे पतीसह सासरच्यांनी सांगितले. तिने नकार दिला. त्याचाच राग येऊन सासरच्या मंडळीकडून तिचा शाररीक आणि मानसिक छळ करण्यात आला.
या वादात जयश्री दिनेश राठोड या विवाहितेला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी तिला खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर जयश्रीच्या जाब जबाबावरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात पती दिनेश जुगराज राठोड, सासरे जुगराज भावसिंग राठोड, सासू जिजाबाई जुगराज राठोड, जेठ वाल्मिक जुगराज राठोड व जेठानी गुड्डीबाई वाल्मिक राठोड सर्व रा. करगाव तांडा क्र. २ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण हे करीत आहे.