दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट

नवी दिल्ली : ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर दिल्ली न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या आणि वकिल निकिता जेकब यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावले आहे. दरम्यान निकिता जेकब यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे. निकिता जेकब या मुंबई उच्च न्यायालयात वकिल म्हणून काम करतात. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या २१ वर्षीय दिशा रवीच्या अटकेनंतर निकिता जेकब यांच्याविरोधात वॉरंट निघाले आहे. दिशा रवीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शेतकऱ्यांशी संबंधित टूलकिट सोशल मीडियावर शेअर केल्याच्या प्रकरणात दिशा रवीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरुन सोमवारी दिल्ली पोलिसांनी निकिता जेकब विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावले. निकिता जेकब यांच्या घराती झडती घेण्यासाठी ११ फेब्रुवारीला पोलिसांची टीम त्यांच्या घरी गेली होती. संध्याकाळच्या सुमारास ही टीम निकिता जेकब यांच्या घरी पोहोचली, त्यावेळी त्यांनी निकिता जेकब यांची कुठलीही चौकशी केली नाही.

 

सामाजिक कार्यकर्त्या, वकिल असलेल्या निकिता जेकब यांनी तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. पण स्पेशल सेलचे अधिकारी त्यांच्या घरी येऊन गेल्यानंतर त्या गायब झाल्या असे दिल्ली पोलिसातील सूत्रांनी सांगितले. पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी निकिता जेकब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  न्यायालयात मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होईल.

Protected Content