मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा संकल्प बोलून दाखविला असला तरी त्यांच्याच राजवटीत २४ दिवसांमध्ये ८९ शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक घोषणा केल्या आहे. यात प्रामुख्याने त्यांनी यापुढे राज्यात कुणी शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी ग्वाही दिली होती. आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हा संकल्प त्यांनी बोलून दाखविला होता. मात्र प्रत्यक्षात असे घडतांना दिसून आलेले नाही. खरं तर काही दिवसांच्या राजवटीतच शिंदे आणि फडणवीस यांनी तीनवेळा मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्यात. या बैठकांमध्ये शहरांचं नामांतर, थेट सरपंच निवडणूक, आरे कारशेड, एमएमआरडीएच्या कर्जाची घोषणा केली आहे, पण अजूनही शेतकर्यांना दिलासा देणारी कोणताही घोषणा सरकारने केली नाही. यातच आता शेतकरी आत्महत्यांबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
शिंदे सरकारच्या राजवटीत राज्यभरात तब्बल ८९ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावरून आता विरोधक हे सत्ताधार्यांना टार्गेट करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला असून राज्याला कृषी मंत्री देखील नसल्यावरून विरोधक आता आक्रमक होण्याची शक्यता आहे.