पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा शितल अकॅडमी येथे उद्या वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त चित्राकृतीचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
पाचोरा येथील चित्रकार व भडगाव येथील सु. ग. पाटील माध्यमिक विद्यालयात कला शिक्षक असलेले योगेंद्र पाटील यांनी रेखाटलेल्या ६०/१० फुटाच्या चित्राकृतीचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार राजेंद्र महाजन यांच्या हस्ते होणार आहे.
पाचोरा येथील चित्रकार योगेंद्र पाटील गेल्या आठ ते दहा वर्षांपासून वीर सावरकर यांचे जीवनावरील विविध अष्ट पैलूंचा सातत्याने अभ्यास करीत आहेत. विर सावरकरांचे प्रेरणादायी विचार तळागाळापर्यंत संपूर्ण भारतभर चित्र रुपाने पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे. योगेंद्र पाटील यांनी आतापर्यंत भगुर (नाशिक) व जळगाव येथे वीर सावरकरांच्या चित्राकृतीचे भव्य प्रदर्शन उभारले होते. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन घेणार असल्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या या भारतभर भ्रमंतीबाबत सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
गतीमय व बोलकी रेषा, ठसठशीत आकार हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्ये आहे. या चित्राकृतीत योगेंद्र पाटील यांनी वीर सावरकरांनी अंदमान येथे भोगलेल्या यातनांचे चित्रण अतिशय बारकाईने व अभ्यासात्मक रितीने मांडले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, संचालक डॉ. जयंत पाटील, सेवा निवृत्त मुख्याध्यापक तथा शिवचरीत्रकार सुनिल पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, सेवा निवृत्त उपप्राचार्य ए. बी. पाटील उपस्थित राहणार आहेत.