शेगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोरोनाचे मळभ दूर झाल्याने यावर्षी पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा सोहळा थाटात साजरा होणार असून श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची दिंडी पंढरीस ६ जून रोजी प्रस्थान करणारा आहे.
पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी श्रींच्या पालखीचे ६ जून रोजी सकाळी ७ वा. मंदिरातून प्रस्थान होणार आहे. ७०० वारकऱ्यांसह श्रींची पालखी मार्गस्थ होणार आहे. श्रींचे पालखीचे पंढरपूर पायदळ वारीचे हे ५३ वे वर्ष असून श्रींची पालखी अकोला, बाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परभणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर या मार्गाने एकूण ७५० किलोमिटर प्रवास करून आषाढ शु ९ शुक्रवार ८ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहचेल. श्रींची पालखी ८ जुलै पासून १२ जुलैपर्यत श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास राहील. आषाढ शु. १५ बुधवार १३ जुलै रोजी सकाळी काला झाल्यानंतर श्रींची पालखी शेगावकरीता परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल अशी माहिती संत श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.