भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक असा शिक्का असतांनाही आमदार संजय सावकारे यांनी आपल्या आगामी वाटचालीबाबत पुन्हा एकदा स्पष्टपणे विवेचन केले आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय म्हणून आमदार संजय सावकारे यांची ओळख आहे. यामुळे ते आगामी विधानसभा निवडणुकीत ऐनवेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून त्याच पक्षाच्या तिकिटावर लढणार असल्याची चर्चा नेहमी रंगत असते. खरं तर, खुद्द आमदार संजय सावकारे यांनी आधी स्पष्टीकरण देत आपण पक्ष बदलणार नसल्याचे सांगितले आहे. तथापि, चर्चांना विराम मिळत नसल्याचे पाहून त्यांनी सिंधी कॉलनीत आयोजीत एका कार्यक्रमात पुन्हा एकदा याबाबत भाष्य केले आहे.
शहरातील सिंधी कॉलनीत प्रभाग २१ मध्ये सिंधी कॉलनीत रामभाऊ बेकरीपासून भक्त निवासापर्यंत पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार संजय सावकारे यांचा हस्ते झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज देशाच्या सुरक्षेसाठी भाजपची आवश्यकता आहे. मला आताही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून ऑफर्स येत आहेत. पण मी आता भाजप सोडणार नाही. देशाच्या सुरक्षेसमोर पद, खुर्ची मोठी नाही. एकवेळ उमेदवारी नाही भेटली तरीही चालेल पण भाजप सोडणार नाही. कारण देशाच्या सुरक्षेसाठी भाजप शिवाय पर्याय नाही, असे आमदार संजय सावकारे म्हणाले. या माध्यमातून त्यांनी भाजपमध्ये राहणार असल्याचे पुन्हा एकदा नमूद केले आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात आमदार संजय सावकारे यांनी प्रभाग क्रमांक अकरामधील विकासकामांचे कौतुक देखील केले. या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष रमेश नागराणी,
माजी नगरसेवक निक्की बतरा, अजय नागराणी, ज्ञानसेठ लेखवानी, त्रिलोक मनवानी, मनोहर सोढाई, राजकुमार वादवानी, सुनीलकुमार बसंतानी, मनोहरलाल तेजवणी आदींची उपस्थिती होती.