गेहलोत यांचा बहुमताचा दावा; लवकरच विधानसभेचे अधिवेशन

जयपूर वृत्तसंस्था । राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्याकडे पूर्ण बहुमत असून लवकरच अधिवेशन घेऊन विश्‍वासदर्शक ठराव संमत करणार असल्याचे त्यांनी आज सांगितले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लवकरच विधानसभा अधिवेशन बोलावणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी जयपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, लवकरच विधानसभा अधिवेशन पार पडणार आहे. आमच्याकडे सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा असून बहुमत आहे. सर्व काँग्रेस आमदार एकत्र आहेत. पुढील आठवड्यात अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता आहे. यात आपल्या सरकारवर विश्‍वासमताचा ठराव संमत करण्यात येणार असल्याचा आशावाद गेहलोत यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अधिवेशन बोलावल्यास सचिन पायलट यांच्यासोबत केलेल्या बंडखोर आमदारांना अधिवेशनात सहभागी होण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकतं. तर व्हीप दिल्यानंतरही आमदार हजर न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तर त्या आमदारांनी जयपूरमधील अधिवेशनात हजेरी लावल्यास त्यातील काही जणांना पुन्हा मागे फिरण्यासाठी प्रवृत्त केलं जाऊ शकतं असे राजकीय निरिक्षकांचे मत आहे.

दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना अपात्र घोषित करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. यावर आज २४ जुलै रोजी राजस्थान उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Protected Content