साने गुरुजींनी केलेल्या कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ फिरत्या कीर्तन मालेचे आयोजन

b4015b07 f5de 4151 859c e36a95729cf9

अमळनेर (प्रतिनिधी) ‘या रे या रे लहान थोर, याती भलते नारी नर’ अशी साद घालून वारकरी संतांनी समतेची वाटचाल सुरू केली. जात, धर्म, पंथ आदी भेद झुगारून माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली. साने गुरुजी यांनी १० दिवस उपोषण करून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून दिला आणि वारकरी संतांची समतेची वाट अधिक प्रशस्त केली आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी निंभोरा येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात केले.

 

वारकरी संतांच्या विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात उमटले आहे, असेही ते म्हणाले. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी साने गुरुजी यांनी १ मे ते १० मे उपोषण केले होते. त्यावेळी त्यांना मोठा विरोधही झाला, मात्र त्यांच्या निर्धारापुढे सर्व व्यवस्था नमल्या आणि अस्पृश्यांना सावळ्या पाडुरंगाच्या दर्शनाचा मार्ग मोकळा झाला. या ऐतिहासिक स्मृती जागवण्यासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक समितीच्यावतीने ह.भ.प. शामसुंदर महाराज यांच्या तीन दिवसीय फिरत्या कीर्तन मालिकेचे जळगाव जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिले पुष्प निंभोरा येथे गुंफण्यात आले.

यावेळी बोलताना शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, वारकरी संतांनी सामाजिक समतेची वाटचाल सुरू केली. आजही पंढरपूरच्या दिंडी सोहळ्यात सामाजिक समतेचा अविष्कार पहायला मिळतो. स्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच ही सर्व बंधने झुगारून लोक या दिंडी सोहळ्यात सहभागी होतात. संत नामदेवांनी सर्व समावेशक कीर्तन परंपरा सुरू करून ज्ञान देण्याचा आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार सर्वांना असल्याचा संदेश दिला. वारकरी संतांनी स्रीयांना समतेचा अधिकार देत असतानाच त्यांच्या सक्षमीकरणाचा विचार मांडलेला आहे.

संत जनाबाई तर ”स्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास” अशा शब्दांत स्रीयांना धीर देते, असेही शामसुंदर महाराज म्हणाले. जाती व्यवस्थेने निर्माण केलेल्या उच्च-नीचते विरोधात वारकरी संतांनी बंडखोरी केलेली आहे. यातायाती धर्म नाही विष्णू दासा, अशी साद घालत उच्च-नीचतेला धक्के दिले आहेत. आज सर्वत्र पुन्हा जातीय आणि धर्मांध शक्ती डोके वर काढत आहेत. हे थांबवायचे असेल तर वारकरी संतांनी दिलेल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे. साने गुरुजींच्या उपोषणाच्या स्मृती जागवीत हा कीर्तन महोत्सव आयोजित केल्याबद्दल शामसुंदर महाराज सोन्नर यांनी आयोजकांचे आभार मानले. दर्शना पवार यांनी प्रास्ताविक केले. निंभोरा गावातील उपसरपंच, सानेगुरुजी स्मारक कार्यकर्ते सुनील पाटील व पायल पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून आभारही व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वीतेसाठी सलोनी शिंदे, रोहिणी धनगर, उमेश सोनार, आर. पी. पवार, किशोर महाजन, राणी पाटील व निंभोरा गावातील सर्व ग्रामस्थ, शिक्षक मित्रांनी परिश्रम घेतले.

Add Comment

Protected Content