मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपचे नेते महाराष्ट्रात रोज शिमगा करत असतात. आम्हीदेखील शिमगा करायला सुरुवात केली तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खणले आहेत. ही गोष्ट भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावी, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टिकास्त्र सोडले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपचे नेते दररोज नवनव्या तारखा देतात आणि रंग उधळतात. पण त्यांचे रंग हे नकली आहेत. काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजप सरकार येणार नाही. पण लोकशाहीत सरकार येण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजपने तसे प्रयत्न करावेत.
खासदार राऊत पुढे म्हणाले की, केंद्रीय तपासयंत्रणांचा वापर करून आणि चिखलफेक करून महाविकासआघाडीचे नेते आणि आमदारांचे मनोबल कमी होईल, असे भाजपला वाटत असेल तर ते चूक आहे. तसे काहीही घडणार नाही. शरद पवार यांनीही महाविकासआघाडीच्या आमदारांना, ’मी भाजपला महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येऊन देणार नाही’, असे सांगून आश्वस्त केले आहे. ही केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर महाविकासआघाडीची भूमिका होती, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
गोवा जिंकल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे मनोबल वाढले आहे. पण गोवा काय आहे, हे त्यांना लवकरच कळेल. गोवा काय आहे, तेथील राजकारण काय आहे, हे पोर्तुगीज आणि इंग्रजांनाही समजले नाही. राजकीय पक्षांनाही गोव्यातील राजकारणाचा कधीच अंदाज आला नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाही लवकरच गोवा काय आहे, ते कळेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.