महाराष्ट्रात आढळले कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळले आहेत . त्यात मुंबईतील पाच, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे .

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. खबरदारी म्हणून भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटन बरोबरची हवाई सेवा स्थगित केली आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टि्वट करुन या बद्दल माहिती दिली आहे. “ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे” असे राजेश टोपे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान कोरोनाच्या नव्या विषाणूचा देशात आजवर ३८ लोकांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. कोरोनाचा हा नवा विषाणू सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळून आला होता, जो पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक संसर्गजन्य आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या या विषाणूच्या नव्या प्रकाराचं भारताने यशस्वीरित्या ‘कल्चर’ केलं आहे. ‘कल्चर’ ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पेशी नियंत्रित परिस्थितीत तयार केल्या जातात. विशेषतः त्यांच्या नैसर्गिक वातावरणाबाहेर ही प्रक्रिया केली जाते.

Protected Content