मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने राजकारणात चांगलाच रंग चढवला आहे. हा चित्रपट करमुक्त करा, अशी मागणी भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आम्ही ‘ठाकरे’ चित्रपटही करमुक्त केलेला नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करावा, अशी मागणी भाजप आमदारांनी विधिमंडळात लावून धरली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विधानसभेत भाजपची कोंडी केली होती. त्यांनी मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करून दिली. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काश्मीर फाइल्स’ सिनेमाचा उल्लेख केला. केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला, तर संपूर्ण देशालाच लागू होईल. अगदी जम्मू – काश्मीर ते कन्याकुमारीपर्यत करमुक्त होईल, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर संजय राऊत यांनीही काश्मीर फाइलवरून भाजपला घेरले आहे.
अनेक राज्यात ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी होत आहे. भाजपच्या काही नेत्यांनी विधानसभेतही ही मागणी केली होती. याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’चं काय घेऊन बसलात? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरही ‘ठाकरे’ हा सिनेमा आम्ही बनवला आहे, तोही महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नाही. आम्ही अशी मागणी कधीही केली नाही, असं राऊत म्हणाले.