जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गुरूवारी २४ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील दोन चिमुकलींवर ६२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज बुधवार रोजी शहरासह जिल्ह्यातील विविध संघटनांनी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
दरम्यान ६२ वर्षीय नराधमाच्या फाशीची शिक्षा मिळावी व त्याच्या मुलाला देखील या गुन्ह्यात सह आरोपी करावे. पीडीत मुलींना शासनाकडून असलेल्या योजना व सुविधांचा लाभ व्हावा यासह विविध मागण्यांसाठी जळगावात उद्या २४ फेब्रुवारी रोजी मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शिवतीर्थ मैदान ते जिलहाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात येणार आहे. सर्व समाजासह महिला, पुरूष, तरूण व तरूणींनी या मुक मोर्चा सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.