भुसावळ प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवानिमित्त शहरात जय गणेश फाऊंडेशन संचलीत स्पोर्टस क्लबच्या वतीने राष्ट्रवादी कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खासदार शरद पवारांच्या ८१व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळात जय गणेश फाउंडेशन संचलित स्पोट्र्स क्लबतर्फे जिल्हास्तरीय राष्ट्रवादी कबड्डी चषक आयोजित करण्यात आला आहे. येत्या १५ व १६ डिसेंबर रोजी या स्पर्धा होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिली आहे.
भुसावळच्या सुरभी नगरातील नवसाचा गणपती पटांगण येथे पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धा होतील. १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी असतील. ध्वजारोहण नगराध्यक्ष रमण भोळे, क्रीडांगण पूजन उद्योजक राधेश्याम लाहोटी, नाणेफेक उद्योजक राजेश राका व जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह नितीन बरडे यांच्या हस्ते होईल.
या दोन दिवसीय दिवस-रात्री होणार्या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण१६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या हस्ते होईल. अंतिम सामन्याचे नाणेफेक माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील करतील. प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार मनिष जैन, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्याम कोगटा हे उपस्थित राहणार आहेत.
शहरातील कबड्डी प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थिती लावण्याचे आवाहन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष व जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे, जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज धांडे, सचिव तुषार झांबरे, स्पोट्र्स क्लबचे अध्यक्ष नीलेश कोलते, कार्याध्यक्ष चैत्राम पवार यांनी केले आहे.