मुक्ताईनगरच्या चौकातील स्मारकाला ट्रकची धडक : जमाव संतप्त

मुक्ताईनगर प्रतिनिधी | शहरातील प्रवर्तन चौकातील स्मारकाला आज रात्री ट्रकने धडक दिल्यानंतर संतप्त जमावाने दगडफेक सुरू केल्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले.तर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण शांत केले आहे.

या संदर्भात वृत्त असे की, मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकातील मध्यभागी स्मारक उभारण्यात आलेले आहे. यात महापुरूषांचे पुतळे आहेत. आज रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गुरे वाहून नेणार्‍या एका ट्रकने स्मारकाच्या कंपाऊंडला धडक दिली. काही क्षणातच ही बातमी शहरातच पसरताच येथे जमाव जमला आणि जमावाने दगडफेक सुरू केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले. तसेच या ट्रकमध्ये स्वार असलेल्यांनाही बाहेर काढण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा वातावरण नियंत्रणात आले होते. दरम्यान, प्रवर्तन चौकातील स्मारकाच्या मुख्य पुतळ्यांचे कोणतेही नुकसान झाले नसून नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Protected Content