अवैध वाळू वाहतूक करणार्‍या चौघांच्या विरोधात गुन्हा

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणे परिसरातून अवैध वाळू तस्करीत सहभागी असणार्‍या चौघांच्या विरूध्द पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी बोरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रणाचे आपल्य सहकार्‍यांना निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने १२ रोजी पहाटे हेड कॉन्स्टेबल अरुण बागुल, समाधान पाटील, सागर साळुंखे, रोहिदास आगोने, फारुख शेख यांच्या पथकाने हिंगोणे शिवारात छापा टाकला.

या वेळी पोलिसांना गजानन श्रावण ठाकूर, राज गजानन ठाकूर हे दोघे भ्रमणध्वनीवरून काही लोकांना माहिती देत असल्याचे दिसून आले. त्यांची चौकशी करताच त्यांनी ट्रॅक्टर मालक व चालकांना माहिती पुरवत असल्याचे सांगितले. अर्थात ते खबरी असल्याचे दिसून आले. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी नदी पात्रात जाऊन तपासणी केली. तर चालक किसन भील हा वाळूने भरलेले ट्रॅक्टर रिकामे करून पळून जाताना आढळला. त्याने आपल्या मालकाचे नाव प्रमोद उर्फ भय्या सुभाष महाजन असे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी चौघांना ट्रॅक्टरसह ताब्यात घेऊन समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर चोरी तसेच संघटित गुन्हेगारी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तालुक्यातील वाळू तस्करांवर याच प्रकारची कारवाई अपेक्षित असल्याने या पोलीस कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

Protected Content