जळगाव, राहूल शिरसाळे | जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे सर्वात जलद आणि सर्वात अचूक निकाल आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून जाणून घेतले. आता प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते, विजयी उमेदवारांचे मताधिक्य याबाबतची बिनचूक अर्थात सहकार खात्याने जाहीर केलेली आकडेवारी जाणून घेऊया.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अकरा उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये मुक्ताईनगरमधून माजी मंत्री एकनाथराव खडसे; जळगाव सोसायटी मतदारसंघातून महापौर जयश्री सुनील महाजन, चाळीसगाव सोसायटी मतदारसंघातून प्रदीप रामराव देशमुख; पाचोरा सोसायटी मतदारसंघातून किशोरआप्पा पाटील; जामनेरमधून नाना राजमल पाटील; धरणगावमधून संजय पवार; बोदवडमधून रवींद्रभैय्या पाटील; भडगावमधून प्रतापराव हरी पाटील; अमळनेरमधून आमदार अनिल भाईदास पाटील, पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून अमोल चिमणराव पाटील या उमेदवारांचा समावेश होता. यानंतर उर्वरित दहा जागांसाठी काल म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. आज याचा निकाल जाहीर करण्यात आला.
१) भुसावळ सोसायटी मतदारसंघात एकूण २६ जणांनी मतदान केले होते. यात आमदार संजय वामन सावकारे यांना २२ तर शांताराम पोपट धनगर यांना चार मते मिळाली. येथून संजय सावकारे यांचा १८ मतांनी विजय झाला.
२) यावल सोसायटी मतदारसंघात तिरंगी लढत होती. यात एकूण ४७ मतदान झाले. यात विनोदकुमार पंडित पाटील यांना २५ तर गणेश गिरीधर नेहेते यांना २२ मते पडली. तिसरे उमेदवार प्रशांत लिलाधर चौधरी यांना शून्य मते मिळाली. यामुळे येथून विनोदकुमार पाटील यांचा तीन मतांनी विजय झाला.
३) चोपडा सोसायटी मतदारसंघातही तिरंजी लढत होती. यात ६३ जणांनी मतदान केले. यात सहकार पॅनलचे घनश्याम अग्रवाल यांना सर्वच्या सर्व म्हणजे ६३ मते मिळाली. तर त्यांचे विरोधक डॉ. सुरेश शामराव पाटील आणि संगीताबाई प्रदीप पाटील यांना शून्य मते मिळाली. यामुळे येथे घनश्याम अग्रवाल यांचा ६३ मतांनी विजय झाला.
४) रावेर सोसायटी मतदारसंघात तिरंगी लढत असली तरी दोन्ही मतदारांनी अरूण पांडुरंग पाटील यांना पाठींबा दिला होता. मात्र शेवटच्या टप्प्यात सहकार पॅनलच्या जनाबाई गोंडू महाजन यांनी आगेकूच केल्याने लढत रंगतदार झाली. येथे एकूण ५१ जणांनी मतदान केले. यात अरूण पाटील यांना २५ तर जनाबाई महाजन यांना २६ मते मिळाली. यामुळे अवघ्या एक मताने जनाबाई महाजन यांनी बाजी मारली.
५) अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात तिरंगी लढत होती. यात १६१५ मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये सहकार पॅनलचे शामकांत बळीराम सोनवणे यांना २४६४; नामदेव भगवान बाविस्कर यांना ८३ तर प्रकाश यशवंत सरदार यांना ६८ मते मिळाली. अर्थात येथून शामकांत सोनवणे हे तब्बल २३८१ मतांनी विजयी झाले.
६) इतर मागासवर्ग मतदारसंघात चौरंगी निवडणूक झाली. यात एकूण २६२१ मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये माजी मंत्री तथा सहकार पॅनलचे नेते डॉ. सतीश पाटील यांना २३१६; विकास मुरलीधर पवार यांना २४२, प्रकाश जगन्नाथ पाटील यांना ४० तर राजीव रघुनाथ पाटील यांना २३ मते मिळाली. म्हणजेच येथून डॉ. सतीश पाटील हे २०७४ मतांनी विजयी झाली.
७) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात एकास एक लढत झाली. येथे २६०६ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात मेहताबसिंग रामसिंग नाईक यांना २३२६ तर विकास ज्ञानेश्वर वाघ यांना २८० मते मिळाली. यामुळे मेहताबसिंग नाईक यांचा २०४६ मतांनी विजय झाला.
८ आणि ९ ) महिला राखीव मतदारसंघातून सहकार पॅनलच्या उमेदवार तथा मावळत्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर या २३३५ तर शैलजादेवी दिलीप निकम या १९२५ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या विरोधातील उमेदवार अरूणा दिलीपराव पाटील यांना ५२४; कल्पना शांताराम पाटील यांना १११, सुलोचना भगवान पाटील यांना ११ तर शोभा प्रफुल्ल पाटील यांना सहा मते मिळाली.
१०) इतर संस्था आणि व्यक्तीगत सभासद या वर्गवारीमध्ये पंचरंगी लढत झाली. या प्रवर्गात एकूण १८०५ मतदान झाले. यातील सहकार पॅनलचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना १६०१; जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांना १८१; प्रकाश यशवंत सरदार यांना १३; प्रकाश जगन्नाथ पाटील यांना ७ तर उमाकांत रामराव पाटील यांना ३ मते मिळाली. यामुळे येथून गुलाबराव देवकर यांनी तब्बल १४२० मतांच्या फरकाने विजय मिळविला.
या निकालातून भुसावळ सोसायटी मतदारसंघाचा अपवाद वगळता उर्वरित २० जागांवर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने विजय संपादन करून आपले एकहाती वर्चस्व सिध्द केले आहे.