जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांतर्गत दिव्यांग कल्याण राष्ट्रीय समितीमध्ये दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती अतिशय महत्वाची असून यात देशातील दहा मान्यवरांचा समावेश असतो. यातच यजुवेंद्र महाजन यांना स्थान मिळाले आहे.
यजुवेंद्र महाजन यांनी दीपस्तंभ फाऊंडेशनच्या माध्यमातून खान्देशात स्पर्धा परिक्षेची एक मोठी चळवळ सुरू केली असून यातून हजारो तरूण अधिकारी बनले आहेत. तर अलीकडच्या कालखंडात मनोबल फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दिव्यांगांसाठी भरीव कार्य केले आहे. याची दखल घेऊन त्यांची दिव्यांग कल्याण राष्ट्रीय समितीमध्ये निवड करण्यात आलेली आहे.
आयोगाच्या अंतर्गत दिव्यांगांच्या संदर्भातील शासकीय धोरण, नियम यांचा आढावा घेणे, त्यामधील बदल सुचविणे, तसेच अंमल बजावणी होण्यासाठी प्रयन्त करणे असे या समितीचे कार्य आहे. त्यासोबतच दिव्यांगांच्या बाबतीत मानवाधिकार संदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील समस्यांचे निराकरण होण्यासाठी प्रयत्न करणे. दिव्यांगांच्या बाबतीतील समस्यांचा व त्यांच्या भविष्यातील धोरणांचा वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि देशामध्ये जाऊन अभ्यास करणे या संदर्भात या समिती सदस्यांचे कार्य असणार आहे.
दरम्यान, दिव्यांगाच्या सक्षमीकरणाच्या धोरणाशी सुसंगत राहून व त्यांच्या विविधांगी समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीने या पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न भविष्यात करणार असल्याचे प्रतिपादन महाजन यांनी केले आहे.