तरुणाचा प्रामाणिकपणा परप्रांतीय तरूणाचे पाकीट केले परत

पारोळा, प्रतिनिधी । महामार्गावरून रोज शेकडो परप्रांतीय मजूर हे पायी आपापल्या गावी परतत आहे. अश्याच एका परप्रांतीय तरुणाचे सापडलेले पाकीट शंतनु पाटील या तरुणाने प्रामाणिकपणे परत केले आहे. शंतनूच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून रोज शेकडो कामगार तरुण परप्रांतीय हे आपापल्या नियोजित ठिकाणी जात आहे. काल असेच सहा सात तरुण हे पायी जात असतांना काही काळ महामार्गावरील शेतकरी संघ बाहेरील बाकांवर विश्रांतीसाठी बसले होते. त्यातील एका तरुणाचे खिशातून पाकीट खाली पडून गेले होते. ते त्या तरुणांच्या लक्षात न आल्याने ते तसेच पुढे प्रवासासाठी निघून गेले. शेतकरी संघातील कारकून शंतनू पाटील हा तरुण त्यानंतर बाहेर आला असता त्याला त्या ठिकाणी ते पाकीट पडले असल्याचे दिसून आले. याठिकाणी यापूर्वी परप्रांतीय तरुण हे बसले असल्याचे शंतनुला माहित होते. त्याने ते पाकीट उचलून घेत. पाहिल्यावर त्यात परप्रांतीय तरूणाचे आधार कार्ड, एटीएम कार्ड, कंपनी आय कार्ड व काही रोख पैसे असल्याचे दिसून आले. शंतनुने या परप्रांतीयची आजूबाजूला चौकशी केली असता ते तरुण दिसून आले नाहीत. परिणामी त्याने स्वतःची मोटरसायकल काढून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या या परप्रांतिय तरुणांचा शोध घेऊन पोलिस लाईनच्या जवळपास त्यांना हेरले व चौकशी करून ते पाकीट संबंधित तरुणाला दिले. पाकीट हरवल्याची कल्पना नसलेल्या या परप्रांतीयाला आपले पाकीट परत मिळाल्याचा आनंद मात्र लपविता आला नाही. विशेष म्हणजे प्रामाणिकपणे पाकीट परत करणाऱ्या शंतनूने या परप्रांतीय तरुणांना त्यांची परिस्थिती व अवस्था पाहून चहा पिण्यासाठी स्वतःहून काही रोख पैसे या तरुणांना देत आपल्यातील सामाजिक बांधिलकी देखील जपली. दरम्यान, शेतकी संघाचे कारकुन शंतनूचे या प्रामाणिकपणाचे संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, व्यवस्थापक भरत पाटील, संचालक सुधाकर पाटील, प्रा. आर. बी. पाटील, विश्वास चौधरी, जिजाबराव पाटील आदींनी कौतुक केले आहे.

Protected Content