जळगाव, प्रतिनिधी | जिल्हाधिकारी म्हटले की, तो संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख असतो. हे पद खूप मोठे असले तरी तितकेच ते जबाबदारीचे आहे. ही जबाबदारी राजेश पाटील, अभिजीत राऊत, डॉ. प्रवीण मुंढे यांच्या सारखे अधिकारी अतिशय समर्थपणे पार पाडत असून त्यांचा आदर्शन नव्याने प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी सज्ज झालेल्यांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील युपीएससी आणि एमपीएससी परिक्षांमधील जिल्ह्यातील यशवंतांच्या पाठीवर दिलखुलासपणे कौतुकाची थाप देतांना त्यांनी वास्तवावर आधारित सल्ला देखील दिला. दीपस्तंभ फाऊंडेशतर्फे आयोजीत उत्सव यशाचा-सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मूळचे एरंडोल तालुक्यातील रहिवासी तथा सध्या पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासह एमपीएससी परिक्षेतील यशवंतांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे व आयकर आयुक्त विशाल मकवाना यांची उपस्थिती होती. याप्रसंगी युपीएससपीमधील यशवंत विनायक नरवाडे; गौरव साळुंखे; श्रीराज वाणी; अक्षय् साबद्रा; श्रीकांत कुलकर्णी; पूजा कदम यांच्यासह एमपीएससीत यश संपादन केलेल्या मानसी पाटील आणि नारायण इंगळे तसेच अधिकारी पदी उत्तीर्ण झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी प्रास्ताविकातून सत्कारार्थींचा परिचय करून दिला. राजेश पाटील, अभिजीत राऊत आणि डॉ. प्रवीण मुंढे यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी इच्छुक असणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकीय अधिकारी सुध्दा हा जनरल फिजीशियन प्रमाणे असतो. त्याच्याकडे शेकडो लोक हे शेकडो समस्या घेऊन येतात. या सर्वांचे निराकरण करण्याचे काम त्यांना करावे लागते. एखादा शेतकरी हा जिल्हाधिकार्यांच्या दालनात येतो तेव्हा त्याला परमेश्वराच्या देव्हारात आपल्याला न्याय मिळेल ही अपेक्षा असते. या अपेक्षांची पूर्तता करण्याचे काम अधिकार्यांनी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनीय अधिकारी हे आपल्या लोकशाही प्रणालीचे दोन महत्वाचे घटक आहेत. अधिकारीपद हे फक्त मिरवण्यापुरते नसते, तर या माध्यमातून समाजसेवेची आपल्याला मोठ्या प्रमाणात संधी मिळत असते. अलीकडच्या काळात युपीएससीत उत्तीर्ण होणार्यांचा टक्का वाढल्याची बाब समाधानकारक आहे. राजेश पाटील हे आयएएस झाले असतांना एरंडोल तालुक्याचे आपण आमदार होतो. त्यांच्या पहिल्या सत्काराचा मान आपल्याला मिळाला होता. आज राजेश पाटील यांची देशभरात ख्याती असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आयएएस हा सेवेचा मापदंड आहे. विविध क्षेत्रांमधील यशवंत हे याच प्रमाणे आयुष्यात यशाचे शिखर गाठत असतात. याचा विचार केला असता आपण देखील राजकारणातील आयएएस असल्याचे ना. पाटील यांनी म्हटताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर पसरली. स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी जिद्द व चिकाटी तर आवश्यक आहेच. पण याच्या जोडीला प्रारब्धाची जोड देखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अलीकडच्या काळात पालकांना शिक्षणाचे महत्व समजले असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/543421750056448