फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी)। महात्मा गांधी हे व्यक्ती नसून विचार आहेत जे कधीही नष्ट होणार नाहीत यासोबत लालबहादूर शास्त्री यांच्यासारखे करारी, धाडसी व सत्तालालसा नसणारे नेते खऱ्या अर्थाने समाजाला प्रेरक आहेत. अशा थोर महापुरूष यांचा आदर्श, आचार, विचार व संस्कारांचे आचरण आजच्या तरूण पिढीने घ्यावा असे गौरवोद्गार पदार्थविज्ञान विभाग प्रमुख व नेहरू अध्ययन केंद्राचे समन्वयक डॉ सतीश चौधरी यांनी काढले.
तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय सण व उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहिंसा दिवसाच्या औचित्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत बोलत होते.
यावेळी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी व श्री शिरीषदादा मधुकराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. वाघुळदे यांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी डॉ.सतीश चौधरी यांनी दोन्ही महापुरुषांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर प्रकाश झोत टाकत सद्यपरिस्थितीत दोन्ही व्यक्तिमत्त्वांचे समर्पकता ओघवत्या भाषेत उपस्थितांसमोर मांडली. त्यानंतर प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी यांनी उपस्थित सर्वांनाच महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे अध्ययन करून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्यांचे खरे विचार पोहोचवून समाज विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले. कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांच्या अटींचे काटेकोर पालन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले तर उपप्राचार्य प्रा. अनिल सरोदे, महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राचे समन्वयक तथा इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.जगदीश पाटील, राष्ट्रीय सण व उत्सव समितीचे प्रमुख डॉ.आय. पी. ठाकूर, डॉ. आर.पी. महाजन, प्रा. एम. एन. राणे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. वंदना बोरोले, डॉ. ए. के. पाटील, प्रा. आर. पी. झोपे, प्रा. डी. आर. तायडे, डॉ. जी. एस. मारतळे, डॉ. रवी केसुर, डॉ. हरीश तळेले, ग्रंथपाल प्रा. आय. जी. गायकवाड, राजेंद्र तायडे, आर. एस. सावकारे, गुलाब वाघोदे, सिद्धार्थ तायडे, शेखर महाजन, चेतन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.