चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील कॅप्टन कॉर्नर येथे राहणाऱ्या एका खासगी डॉक्टराच्या घरातील लोखंडी कपाटातून अज्ञात इसमाने २ लाख ६ हजार रुपये रोखड लंपास केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, विवेक बळवंतराव बोरसे (वय-४०) रा. कॅप्टन कॉर्नर चाळीसगाव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून शहरातील चिरायू दवाखान्यात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान बोरसे हे नेहमीप्रमाणे ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. घराला कुलूप लावून दवाखान्यात निघून गेले. दवाखान्यातील काम आटोपल्यानंतर ते सायंकाळी ४:३० वाजता घरी परतले. घरातील सर्व जण मुंबई येथे गेलेले असल्याने त्यांना झोप लागली. सायंकाळी ७ वाजता बोरसे झोपेतून उठल्यावर त्यांना लोखंडी कपाटाला चावी लावलेली असल्याचे दिसून आली. त्यावर त्यांनी कपाटात पाहणी केली असता त्या कपाटात ठेवलेले ५ लाखांऐवजी २ लाख ६ हजार रुपये हे दिसून आले नाही. घरात शोधाशोध केल्यावर पैसे मिळून आले नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने पैसे चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि डिकले हे करीत आहेत.