मुक्ताईनगर प्रतिनिधी । आषाढी वारीत पंढरपूर क्षेत्रात संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी काल संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने विविध फडाचे मठात जावून संत महंतांच्या गाठीभेटी घेत दर्शन घेतले.
पंढरपूर येथे संत मुक्ताबाई पालखीचा काल तीसरा मुक्काम होता.सकाळ सत्रात ह.भ.प. विजय महाराज खवले यांचे कीर्तन झाले.दुपारी देहूकर फडाचे जगतगुरु तुकाराम महाराज वंशज ह.भ.प.बाळासाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन झाले. तसेच संचारबंदीत थोडी ढील मिळाल्याने वारकऱ्यांनी देगलूरकर,वासकर,बेलापूर कर,अमळनेरकर, राऊत महाराज, चैतन्य महाराज, हनुमंत मते महाराज, बोधले महाराज, सखाराम महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज देहूकर, चातुर्मास्ये महाराज, धोडोंपंतदादा, बंकटस्वामी, झेंडूजी महाराज, अशा विविध मठात जावून संतमंडळी गाठीभेटी व दर्शन घेतले. तसेच आज दुकाने उघडली असल्याने बुक्का , अष्टगंध, प्रसाद वगैरे खरेदी केली.
आज माऊलीकडून मुक्ताबाईस साडीचोळी भेट व पूजाविधी होणार असून आषाढी वारीत आषाढ चतुर्दशी ला ज्ञानदादाकडून बहीणीस साडीचोळी भेट सोहळा होत असतो.आज सकाळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमीटी आळंदी तर्फे विश्वस्त,पुजारी य येणार असून पुजाविधी अभिषेक सोहळा होणार आहेत.
पांडूरंगाचे दर्शनाची लागली आस
संत मुक्ताबाई पालखी सोहळा सोबत आलेल्या वारकरी भाविकांना आता पांडुरंगाचे दर्शनाची आस लागली आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर समिती विश्वस्त ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी ४० विठ्ठल दर्शन पास संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांचेकडे सुपूर्द केल्या त्यावेळी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे उपस्थित होते शनिवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८.३० ते ९ दर्शनाची वेळ देण्यात आली आहे. देगलूरकर फडावर गुरूवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या गाठीभेटी घेतांना भैय्यासाहेब रविंद्र पाटील ,रवींद्र महाराज हरणे, प्रदिप झांबरे ,विशाल महाराज खोले, नरेंद्र नारखेडे, पंढरीनाथ महाराज आदि यावेळी उपस्थितीत होते.