जळगाव, राहूल शिरसाळे । महापालिकेतील सत्तांतरात आपली थेट भूमिका असल्याचा दावा करणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज थेट सत्ताधार्यांवरच कमिशनखोरीचा आरोप करून शहराच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ही फक्त महाविकास आघाडीतील ठिणगी नसून आगामी काळातील राजकारणाची चुणूक यात असल्याचे दिसून येत आहे. जाणून घ्या नाथाभाऊंच्या या आक्रमक पवित्र्यामागील कार्यकारणभाव !
मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेने राजकीय चमत्कार घडवत सत्ता संपादन केली. यासाठी भाजपमध्ये उभी फूट पाडण्यात आली. या सत्तांतराला अनेक आयाम होते. मात्र याचे सर्वात पहिले श्रेय हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी घेतले. त्यांनी आपण यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आधीच या शक्यतेबाबत माहिती देऊन चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे जळगाव महापालिकेतील सत्तांतरातील एक महत्वाचे व्यक्तीमत्व म्हणजे नाथाभाऊ असल्याचे मानले जात होते. तर, नवनिर्वाचीत महापौर आणि उपमहापौरांनी एकनाथराव खडसे यांची सदिच्छा भेऊ घेऊन आगामी वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद देखील घेतले होते. राज्यातही शिवसेना व राष्ट्रवादी सोबत असल्याचे जळगाव महापालिकेच्या राजकारणात दोन्ही पक्षांमध्ये सलोखा असेल असे वाटत होते. मात्र आज खडसे यांनी थेट काही सत्ताधारी नगरसेवकांना शिवाजीनगर पुलाच्या विजेच्या कामात कमिशन हवे असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.
नाथाभाऊंनी आपला पवित्रा बदलण्याचे नेमके कारण काय ? हे आजच थेट सांगता येणार नाही. मात्र जळगाव महानगर राष्ट्रवादीवर आपला वरचष्मा असावा असे त्यांचे आधीपासूनच प्रयत्न सुरू आहेत. तसेच, विद्यमान महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या जागी आपल्या समर्थकांची वर्णी लावण्याचेही त्यांचे प्रयत्न आहेत. खरं तर, जळगाव महापालिकेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही. यामुळे थेट सभागृहात सत्ताधार्यांची कोंडी करण्याची संधी या पक्षाला नाही. आगामी काळात शहराच्या राजकारणात मजबूत स्थिती करायची असल्यास महापालिकेतील सत्ताधार्यांना कब्जात करणे आवश्यक आहे. ही बाब थेट शक्य नसल्याने अप्रत्यक्ष रितीने करता येईल हे नाथाभाऊंसारख्या मुरब्बी नेत्याला चांगलेच माहित आहे. यामुळे सत्ताधारी नगरसेवकांना कमिशन हवे असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. अर्थात, आपल्या समर्थकांच्या माध्यमातून जळगाव महानगर राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याची ही पहिली पायरी असल्याची बाब मानता येईल.
यातील दुसरा आयाम हा मुक्ताईनगरात शिवसेना व राष्ट्रवादीत असणार्या टोकाच्या विरोधाचाही असू शकतो. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना मुक्ताईनगर नगरपंचायतीतील खडसे समर्थक नगरसेवकांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी गळाशी लावल्याची बाब खडसेंच्या नक्कीच जिव्हारी लागलेली असेल. आज दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले तरी अनेक ठिकाणी त्यांच्याच प्रचंड खुन्नस आहे. आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही एकत्र येतीलच याची शक्यता नाही. यामुळे आतापासूनच आपल्या आक्रमकतेची चुणूक दाखविण्यासाठी जळगाव महापालिकेतील सत्ताधारी हे तसे सोपे टार्गेट आहे. कारण शिवसेनेतील दुफळीमुळे महापालिकेतील सत्ताधार्यांनाही खमक्या गॉडफादर नाही. शिवसेनेत आधीच गटबाजी असून भाजपमधून पक्षात आलेले अजूनही येथे पूर्णपणे रूळलेले नाहीत. यामुळे महापालिकेतील शिवसेनेत तसे गोंधळाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमिवर, थेट आरोपांचे दबावतंत्र हे सत्ताधार्यांना अस्वस्थ करण्यासोबत राष्ट्रवादीला आक्रमकता प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हीच आक्रमकता भारतीय जनता पक्षाला नामोहरम करण्यातही उपयोगी पडू शकते.
या सर्व बाबींचा एकच सार आहे….जळगावच्या राजकारणात एकनाथराव खडसे यांचा आपले वर्चस्व मिळवायचे आहे. हा एकछत्री अंमल नसला तरी किमान एक मोठा गट आपल्या सोबत असावा अशी त्यांची इच्छा असू शकते. यामुळे सत्ताधार्यांवर नाथाभाऊंनी थेट आरोप केल्याची बाब उघड आहे. यातून जळगाव महानगराच्या विविध इश्यूजच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा विविध आरोपांच्या सरबत्ती करतील असे आज तरी दिसून येत आहे. अर्थात, महाविकास आघाडीतील विसंवादाचा मुक्ताईनगरचा दुसरा अंक हा जळगावात घडेल असे आजच स्पष्ट झालेले आहे. अर्थात, एकनाथराव खडसे यांनी आज केलेले आरोप हे तर ट्रेलर असून पूर्ण चित्रपट वेगवेगळ्या भागांमध्ये पुढे समोर येईल याची शक्यता आहेच !