मुंबई । राज्यात आज तर १०६९७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज १४९१० कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आज दिवसभरात १४ हजार ९१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण काही प्रमाणात वाढलं आहे. मात्र, तरीदेखील नव्या करोनाबाधितांची संख्या मात्र अजूनही १० हजारांच्या वर असल्यामुळे एकूण पॉझिटिव्हिटी रेट अद्याप नियंत्रणात आलेला नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या निकषांनुसार पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी या घटकांवरून निर्बंध कमी किंवा जास्त याविषयी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट कमी होणं ही महत्त्वाची बाब ठरली आहे.
दरम्यान, राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे तो म्हणजे राज्याचा मृत्यूदर. एकूण करोनाबाधितांची संख्या अधिक असल्यामुळे अद्याप राज्याचा मृत्यूदर १.८४ टक्के आहे. मात्र, दुसरीकडे रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या ३०० च्या आसपास असल्यामुळे ती चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३६० मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात १ लाख ८ हजार ३३३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.